जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- फैजपूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते निलेश उर्फ पिंटू राणे यांना जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून, ही बंदी 19 जुलैपासून 16 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी फैजपूर येथील प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात राणे यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. याआधी, 15 जुलै रोजी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अनुचित प्रकारे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते. या घटनांमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि त्यांनी निषेध आंदोलन छेडले होते.
ही बंदी रावेर आणि यावल तालुक्यांतील सर्व प्रशासकीय कार्यालयांसाठी लागू असून, या काळात राणे यांना कोणतीही तक्रार ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल. तसेच, आवश्यक त्या सुनावणीसाठी ते टेलिफोनिक माध्यमातून उपस्थित राहू शकतील. निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांना कार्यालयात एक तासाची मुभा देण्यात येणार असल्याचं आदेशात नमूद आहे. हा आदेश प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी सांगितले की, “मी जनतेसाठी लढा देतोय. शासकीय कार्यालयांमध्ये माझ्या सततच्या उपस्थितीमुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. ही बंदी म्हणजे माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न असून, ती लोकशाहीच्या मूल्यांशी विसंगत आहे.”