२६ नोव्हेंबरला होणार चिन्ह वाटप, तर ३० नोव्हेंबरला प्रचारबंदी; अपक्षांची डोकेदुखी वाढली…
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- माघारीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच जिल्ह्यातील १८ नगरपालिकांमधील निवडणूक लढती स्पष्ट झाल्या आहेत. पक्षीय उमेदवारांनी चिन्ह मिळताच प्रचाराला वेग दिला आहे. मात्र अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजीच निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने त्यांना अवघ्या चार दिवसांत चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे. ३० नोव्हेंबरपासून प्रचारबंदी लागू होत असल्याने अपक्षांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. माघारीनंतर सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी एकूण १५५५ उमेदवार रिंगणात उरले असून त्यापैकी सुमारे १२०० उमेदवार हे पक्षचिन्हावर लढत आहेत. दरवेळी माघारीनंतर लगेच चिन्ह वाटप होत असताना, यंदाच्या अल्प निवडणूक कार्यक्रमामुळे अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे.
अपक्ष उमेदवारांची धावाधाव…
नगराध्यक्षपदासाठी जवळपास २० अपक्ष उमेदवार उभे आहेत. माघारीनंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम समजताच अनेक अपक्षांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेत नाराजी व्यक्त केली. “साहेब, ही अडचण कशी झाली?” असा सवाल करत त्यांनी कमी कालावधीत संपूर्ण गावभर चिन्हाचा प्रचार कसा करायचा, याबाबत चिंता व्यक्त केली. उमेदवारी अर्ज १८ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात आले. २१ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत होती. त्यानंतर २५ नोव्हेंबरपर्यंत अपीलाची संधी देण्यात आली असून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करून अधिकृत यादी जाहीर केली जाणार आहे.
पक्षीय उमेदवारांचा ‘सुसाट’ प्रचार..
दुसरीकडे, पक्षीय उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी ‘एबी’ श्रेणीत झाल्यामुळे त्यांची उमेदवारी वैध ठरली आहे आणि त्यांना तात्काळ पक्षचिन्हाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे. त्याउलट अपक्ष उमेदवारांना चिन्हाविना केवळ हातजोड प्रचार करावा लागत असल्याने त्यांची धांदल उडाली आहे.

