Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावनगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात १९ ते २१ डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात १९ ते २१ डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांतील काही प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) यांनी १९ ते २१ डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव व पाचोरा या सहा नगरपरिषदांतील नऊ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार १९ डिसेंबर (मतदानाच्या आदल्या दिवशी), २० डिसेंबर (मतदानाचा दिवस) तसेच २१ डिसेंबर (मतमोजणीचा दिवस) मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव व यावल या नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

सदर आदेशाचे संबंधित सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोर पालन करावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या