नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल; शिक्षणाचा नवा प्रकाश, ग्रामीण भागात जागलेली ज्ञानज्योत!
चिनावल/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे दि.16 जून रोजी प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत आणि पाठ्यपुस्तक वितरण सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रवेशद्वारावर फुलांच्या पायघड्यांनी आणि फुगे-झेंड्यांनी सजवलेल्या मार्गाने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. हसरे चेहरे, हातात पुस्तकं, आणि पालकांच्या उपस्थितीत परिसर आनंददायी झाला होता.कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व संचालक, मुख्याध्यापक, उपशिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांच्या पालकांसह गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदितांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
प्रत्येक नवागत विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात आली. यावेळी शिक्षण हेच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे, ही भावना सर्वांच्या मनात ठसली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्नांचे रंग खुलले होते.
“शाळा म्हणजे स्वप्नांची शिदोरी” – मुख्याध्यापक यांचे विचार
मुख्याध्यापकांनी पालकांना उद्देशून सांगितले की, “शाळा ही केवळ अभ्यासाची जागा नसून ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मूर्तरूप देणारी गोतावळा आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.”
व्यवस्थापन समितीचे मनोगत
शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीचे कौतुक केले. नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना पालकांना सहकार्याचे आवाहनही त्यांनी केलं.
शिक्षणात मूल्यांची पेरणी; शाळेचे विशेष वैशिष्ट्य
नूतन प्राथमिक विद्यामंदिर हे केवळ ज्ञानकेंद्र नाही तर मूल्यशिक्षण, सामाजिक भान आणि सृजनशीलतेच्या विकासासाठी कार्यरत आहे. “विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचे बीज रोवणे हेच आमचे खरे ध्येय,” असे शिक्षकांनी यावेळी सांगितले.