चिनावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने विरबॅक ऍनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या सुप्रसिद्ध कंपनीच्या वतीने सी.एस.आर. निधीतून वॉटर प्युरिफायर आणि थंड पाण्याचा कुलर नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल या शाळेस देणगीस्वरूपात प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली असून शाळेच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधेत मोलाची भर पडली आहे.
या कार्याचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि समाधानदायी वातावरणात पार पडला. या प्रसंगी विरबॅक ऍनिमल हेल्थ प्रा. लि. चे एरिया बिझनेस मॅनेजर विक्रम खोटे , बिझनेस ऑफिसर जळगाव प्रकाश आलकड, तसेच शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल चे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन, चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र वामन फालक, ग्रामपंचायत सदस्य सागर निळकंठ चौधरी, सूर्या एजन्सी सावदा, वसंत सहकारी दूध संस्थेचे सेक्रेटरी सुधाकर लालू बोंडे, संचालक अजय वसंत महाजन, रवींद्र तुळशीराम पाटील व सहभाग पशुपालक तसेच एच. आर. ठाकरे हे मान्यवर विशेष उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सागर निळकंठ चौधरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला. शाळेच्या हितासाठी त्यांनी केलेल्या या योगदानाचे सर्व स्तरांवर कौतुक व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना विक्रम खोटे यांनी “पाणी हेच जीवन” या संकल्पनेवर भाष्य करत स्वच्छ पाण्याचे आरोग्यदायी महत्त्व, अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार, तसेच पिण्याच्या पाण्याची काटकसर कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण सर्वांसमोर ठेवले.आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, शिस्त आणि पर्यावरण संरक्षणाचे भान यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यात अशा समाजहितकारी उपक्रमांची परंपरा पुढे चालू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विरबॅक कंपनीचे अधिकारी, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कंपनीच्या या योगदानाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे शाळेचा दर्जा व विद्यार्थी कल्याण दोन्ही वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून आधुनिक शैक्षणिक साधनसामग्रीसह उत्कृष्ट भौतिक सुविधा देणारी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शाळा म्हणून चिनावल पंचक्रोशीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि उत्तम शैक्षणिक वातावरण देण्याचे हे विद्यालय आपले ध्येय मानून सतत प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.
पाणी हेच जीवन — या विचारातून साकार झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद ठरला असून, समाजसेवेचा व शिक्षणसेवेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून साकार झाला आहे.