पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या १२ तासांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीस जेरबंद करून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील दोषारोपपत्रही अवघ्या १२ तासांत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२५ वाजेच्या सुमारास फिर्यादी किशोर आनंदराव नरेराव (वय ३९, व्यवसायिक, रा. कृष्णपुरी, पाचोरा, मूळ रा. निभोरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी त्यांच्या चारचाकी वाहनात पॉवर बँकला मोबाईल चार्जिंगसाठी लावला असताना अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने त्यांचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात रात्री ९.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने हालचाली करत सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपास सुरू असतानाच संशयित इसम फिरताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड), वय २५ वर्षे, रा. कळमसरे, ता. पाचोरा, जि. जळगाव असे सांगितले. प्राथमिक चौकशीत त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पहूर पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचा मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तपासात आरोपीकडून १५ हजार रुपये किंमतीचा फिकट रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल (IMEI क्र. 8671790518504878) तसेच ५ हजार रुपये किंमतीचा विवो Y27 Pro असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र अवघ्या १२ तासांत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले असून आरोपीस पुढील कारवाईसाठी धुळे सबजेल येथे पाठविण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.राहुल काशिनाथ शिंपी हे करीत असून ही संपूर्ण कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ अशोक रामचंद्र हटकर, सफी गणेश विरभान पाटील, पोको शरद मांगो पाटील व पोको संदीप किसन भोई यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

