पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा शहरात पोलिसांनी गुप्त बातमीवरून केलेल्या धडक कारवाईत तब्बल १८ तलवारी जप्त करत एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या अवैध शस्त्रसाठ्याची एकूण किंमत अंदाजे ५४ हजार रुपये इतकी असून, आरोपीने यापैकी काही तलवारी आधीच विकल्याची कबुली दिली आहे.
घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत कळविण्यात आले की, माहिजी नाका परिसरात तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कारवाई केली. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा येथील राहणारा सोहेल शेख तय्युब शेख (वय २४ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, तो तलवारी विक्रीसाठी आणत होता तसेच याआधी काही तलवारी विकल्या असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून १८ तलवारी जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रविक्रीच्या प्रकाराला मोठा आळा बसला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोलीस नाईक संदिप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांनी सहभाग नोंदविला.

