पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा तालुक्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बसचालकाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित गावातील काही विद्यार्थी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे शिक्षणासाठी शाळेच्या बसने प्रवास करतात. गेल्या महिन्यात आरोपी अबिद हुसेन शेख जलील (वय ३८) हा दुचाकीवरून मुलीच्या गावात आला होता. त्या वेळी त्याने पीडितेचा पाठलाग करून “तू मला आवडतेस” असे म्हणत विनयभंग केला होता. या प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
यानंतर १९ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलिसांत आरोपीविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी दिलेल्या पुरवणी जबाबात पीडित विद्यार्थिनीने स्पष्ट केले की, आरोपी बसचालकाने माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तो वारंवार फोनवरून अश्लील बोलत धमकावत असे, असेही तिने सांगितले.
दरम्यान, शाळेच्या बसमधून रोज ५० ते ६० विद्यार्थी ये-जा करतात. आरोपीने यापूर्वी इतर विद्यार्थिनींना त्रास दिला आहे काय? याबाबतही पोलिस तपास सुरू आहे.