पाचोरा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील २९ वर्षीय तरुणाला अवैधरित्या तलवार बाळगल्या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर युवक अर्जुन किसन बंजारा (वय २९, रा. कुऱ्हाड तांडा) हा गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या घरात तलवार ठेवून असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी हेडकॉन्स्टेबल अतुल पवार, शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व प्रमोद वाडिले यांना पाठवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी अर्जुन बंजारा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तलवार घरातील पत्र्याच्या कोठीत ठेवली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष सदर तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी अर्जुन किसन बंजारा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अतुल पवार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

