भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील अकलूद/पाडळसे येथे आचार्य पंडित मिश्राजी सिहोरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभत आहे. या कथा स्थळी अनेक भाविक मुक्कामी राहत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर असोसिएशनच्या वतीने मोफत औषध वितरणाचा स्टॉल उभारण्यात आला आहे.
कथा स्थळी उपस्थित असलेल्या भाविकांना अचानक प्रकृती बिघडल्यास किंवा लहान-मोठ्या आजारांवर त्वरित उपचार मिळावेत या हेतूने ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक भाविकांना तातडीने औषधोपचार मिळून दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर असोसिएशनकडून राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात येत असून ही सेवा अत्यंत मोलाची असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्या ठिकाणी जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर असोसिएशनच्या वतीने अशा प्रकारचे मोफत औषध वितरण स्टॉल उभारून सेवा देण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

