पहूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- पहूर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसा घरफोडी करणारा अट्टल व सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पहूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जेरबंद केला आहे. आरोपी किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलढाणा) याने दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी मौजे तोंडपूर व पहर गावात एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी केल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. ३३०/२०२५ व ३३१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ अन्वये गुन्हे दाखल होते.या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पहूर पोलीस स्टेशनचे संयुक्त तपास पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी किशोर वायाळ याने सदर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तो सराईत गुन्हेगार असून स्थायिक नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने दोन दिवस त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेला काही मुद्देमाल छत्रपती संभाजीनगर व काही चिखली येथे विकल्याचे सांगितल्यावर त्याच्याकडून एकूण ३ ग्रॅम सोने, किंमत सुमारे १ लाख ९७ हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस दि. ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपी किशोर तेजराव वायाळ हा अट्टल घरफोड्या असून यापूर्वी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, वाशीम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तसेच जळगाव व धुळे जिल्ह्यात आणखी घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे :
१) पहूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३०/२०२५, कलम ३०५, ३३१, २) पहूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३१/२०२५, कलम ३०५, ३३१, ३) जामनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४३/२०२५, कलम ३०५, ३३१, ४) सिंदखेडा पोलीस स्टेशन (जि. धुळे) गु.र.नं. ३०५/२०२५, कलम ३०५, ३३१, ५) सिंदखेडा पोलीस स्टेशन (जि. धुळे) गु.र.नं. ३१५/२०२५, कलम ३०५, ३३१
ही कारवाई मा. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ, श्री. बापू रोहम, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा, यांच्या आदेशानुसार व श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रमोद कठोरे, पोउपनिरी शेखर डोमाळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पहूर पोलीस स्टेशन करीत आहे.

