जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील शिव कॉलनी परिसरात आर्थिक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून डोक्यात दगड फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) सकाळी घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. २३ ऑगस्ट) रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी तरुणाचे नाव अथर्व महेश मुंदडा (वय २१, रा. द्रौपदी नगर, जळगाव) असे आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पैशांच्या वादातून झालेल्या भांडणात प्रथमेश तायडे (रा. वाघ नगर), दुर्गेश पाथरकर (रा. दुध फेडरेशन परिसर) व अभिषेक कुलकर्णी (रा. बळीराम पेठ, जळगाव) या तिघांनी अथर्व मुंदडा याला शिव कॉलनी परिसरात शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
यानंतर दुचाकीवर बसवून शिरसोली रोडवरील जैन व्हॅली परिसरात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अथर्व मुंदडा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोहेका प्रशांत पाठक करीत आहेत.