नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावातील मुक्तेश्वर नगर परिसरात मुलगा व मुलीने पळून जाऊन विवाह केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन शिवीगाळ व हाणामारीची घटना रविवारी दि. १४ डिसेंबर दुपारी सुमारे १ वाजता घडली. या प्रकरणी सोमवारी दि. १५ डिसेंबर दुपारी ३ वाजता परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील एकूण ११ जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्तेश्वर नगर येथे राहणाऱ्या एका मुलगा व मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी पहिला व दुसरा गट यांनी एकमेकांच्या घराजवळ येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून दोन्ही बाजूंना किरकोळ दुखापती झाल्या.या घटनेप्रकरणी परस्परविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत विरणारे करीत आहेत.

