Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमवनविभागात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार..! वनपाल मॅडमसह दोघे एसीबीच्या जाळ्यात ; १ लाखाचे...

वनविभागात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार..! वनपाल मॅडमसह दोघे एसीबीच्या जाळ्यात ; १ लाखाचे लाच प्रकरण उघडकीस

पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वनविभागाच्या पारोळा कार्यालयातील महिला वनपाल अधिकाऱ्यासह एका कर्मचाऱ्याने आणि खासगी इसमाने मिळून बेकायदेशीर लाकूड वाहतुकीतील ट्रक सोडण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदाराच्या भावाने आपल्या शेतातील निंबाची झाडे तोडून लाकूड ट्रकद्वारे मालेगाव येथे वाहतूक करत असताना, सावित्री फटाके फॅक्टरी, रागोर जवळ वन विभागाच्या पथकाने हा ट्रक पकडला. वनपाल वैशाली गायकवाड यांनी ही वाहतूक बेकायदेशीर असल्याचे सांगून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रक ताब्यात घेतला आणि तो श्रीकृष्ण सॉ मिल, पारोळा येथे लावून ठेवण्यात आला.

अडीच लाखांची मागणी, शेवटी तडजोड १ लाखांवर...
ट्रक पकडल्यापासून तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांनी वारंवार वनपाल वैशाली गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन गाडी सोडविण्याची विनंती केली. या दरम्यान गायकवाड यांनी सुरुवातीला २.५ लाख रुपयांची लाच मागणी केली, मात्र अखेरीस तडजोडीअंती १ लाख रुपये घेण्याचे ठरले. ही रक्कम श्रीकृष्ण सॉ मिलचे मालक सुनील धोबी (खासगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगण्यात आली होती.

लाचेची मागणी सिद्ध…
तक्रारदाराने १० डिसेंबर २०२४ रोजी या संदर्भात एसीबीकडे औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर पंच साक्षीदारांसमक्ष पडताळणी करण्यात आली, आणि पडताळणी दरम्यान वनपाल वैशाली गायकवाड, एक वन कर्मचारी आणि सुनील धोबी या तिघांनी लाच मागितल्याचे ठोस पुरावे मिळाले.

गुन्हा दाखल ; वनविभागात खळबळ…
त्यानुसार, पारोळा पोलीस ठाण्यात वनपाल वैशाली गायकवाड, श्रीकृष्ण सॉ मिल मालक सुनील धोबी आणि एक वन कर्मचारी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.या घटनेनंतर पारोळा व परिसरातील वन विभागात चर्चेचा विषय बनला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तपास सुरू केला आहे.

लाचखोरीच्या प्रकरणामुळे वनविभागाच्या प्रतिमेला धक्का…
सरकारी यंत्रणांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा सावली पडली आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर संबंधित विभागातील इतरही व्यवहारांची तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या