जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव- या ना त्या कारणावरून भांडणाच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. सुरुवातीला भांडण हे हलके घेतले जाते,त्यानंतर ते वाढत वाढत जाते..विकोपाला जाते आणि त्यातून अत्यंत भयंकर भांडण होईन मारहाणीच्या घटना घडत असतात,किंबहुना यात अनेकांचा जीव देखील गेलाय.
नातेवाइकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी शहरातील एका कापड दुकानावर आलेल्या पती -पत्नीत घरगुती कारणावरून वाद उद्भवला आणि पतीने पत्नीला ‘तू घरी ये, तुला पाहतोच ‘ असे म्हणत रस्त्यावरच मारहाण केली.
ही घटना १८ नोव्हेंबर शनिवार रोजी संध्याकाळी शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबतच पत्नीचे भाऊ, भावजयी यांच्यासह इतर नातेवाईकही होते.
पती मद्यपान करून आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला.तो वाद चांगलाच विकोपाला गेला.त्यावेळी पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली. नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद सुरूच राहिला.अखेर हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे पत्नीने थेट पतीविरुद्ध फिर्याद देखील दिली. त्यावरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यावेळी पतीनेही पत्नीसह नातेवाइकांनीदेखील मारहाण केल्याचा आरोप केला. बस्ता ज्या दुकानात घ्यायला गेले तेथे न घेता दुसऱ्या दुकानातून घेऊ, असे मी सांगत होतो, त्यावरून मला मारहाण केल्याचे पतीचे म्हणणे होते.
दरम्यान ही घटना भर रस्त्यावर ज्या वेळेस घडत होती,त्यावेळेस बघ्यांचे मनोरंजन होत होते तर काही जण अहो जाऊद्या ,काय भांडण करता आहे ,असे बोलत होते,पण या पती-पत्नीने भांडण जोरात सुरूच ठेवले . परिसरात या भांडणाची चर्चा चांगलीच रंगली होती.