धरणगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होत असलेल्या पैशाच्या मागण्या, घटस्फोटाची धमकी आणि मानसिक छळाला कंटाळून दोनगाव (ता. धरणगाव) येथील हेमंत अरुण पाटील (वय २८) या तरुणाने रेल्वेखाली झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी व सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत पाटील याचे काही काळापासून वैवाहिक जीवन बिघडले होते. पत्नी गायत्री हेमंत पाटील ही माहेरी मंगरूळ (ता. अमळनेर) येथे राहण्यास गेली होती. दरम्यान, हेमंत याच्यावर पत्नी गायत्री आणि सासरे बाळू भीमराव बोरसे तसेच सासू रेखाबाई बाळू बोरसे हे मानसिक ताण देत होते. ‘घटस्फोट घे किंवा पंधरा लाख रुपये दे’ अशी मागणी सतत केली जात होती. या तणावाला कंटाळून हेमंत पाटील २२ जुलै रोजी घरातून निघून गेला आणि त्यानंतर त्याने पाळधी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.
प्रथम मृतदेह अनोळखी असल्याने पोलिसांनी तपास करून मृत व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर हेमंतचे वडील अरुण विश्राम पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पत्नी गायत्री, सासरे बाळू आणि सासू रेखाबाई या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.