नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : नशिराबाद शहरातील पेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या दुचाकी जाळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास करत नशिराबाद पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याने या घटनांचा उलगडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ परिसरातील रहिवासी सिताराम बुधा नाथ यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयू ३४९९) दि. ९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे गेल्या काही काळात या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना होती. यापूर्वी ज्ञानेश्वर नाथ आणि नारायण धनगर यांच्या दुचाकींनाही अज्ञातांनी आग लावल्याच्या घटना घडल्या होत्या.या सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष बाब म्हणजे संबंधित तिन्ही वाहनधारक हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दुचाकी जळाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या कुटुंबांवर त्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनांचा तपास करत नशिराबाद पोलिसांनी रोहित दिलीप नाथ (वय ३०), विपुल गोविंदा नाथ (वय २८) आणि राकेश विजय नाथ (वय ३०) राहणार, नशिराबाद(पेठ) या तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी पेठ परिसरात दुचाकींना आग लावण्याच्या प्रकारात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.पेठ परिसरात सलग घडलेल्या दुचाकी जळीत घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रात्रीची गस्त वाढविणे आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

