जम्मू:- अत्यंत दु:खद बातमी येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अनंतनागमध्ये आणखी एक जवान शहीद झाला आहे. अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे. परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पोलीसांना गुप्त माहिती देणारा खबरी देशद्रोही निघाल्याने चार अधिकाऱ्यांच्या हौतात्म्य देशाला भोगावे लागले आहे. लष्कर आणि पोलीस येत असताना या गुप्तचराने दहशतवाद्यांना टीप दिली होती. तसेच भारतीय लष्कराची टीम कशी आणि कोणत्या संख्येने येत आहे, हे त्याने दहशतवाद्यांना सांगितले होते. तो पोलिसांचा खबरी नव्हता तर दहशतवाद्यांचा गुप्तचर होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे म्हणजे सापळा रचून हल्ला करण्यात आला.
शहीद जवानांची संख्या आता 4 वर पोहचली
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू आहे. घनदाट जंगलात ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. या चकमकीत आतापर्यंत 5 जवान जखमी झाले आहेत. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे, तर शहीद जवानांची संख्या आता 4 वर पोहचली आहे.
घनदाट जंगलात लष्कराकडून कारवाई सुरू
भारतीय लष्कराचे जवान अनंतनागच्या पीर पंजाल भागात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवत आहेत. 4300 किलोमीटर परिसरात पसरलेला हा डोंगराळ भाग दहशतवाद्यांसाठी लपण्याचे ठिकाण आहे. शोध मोहिमेत या भागातील घनदाट जंगले आणि उंच टेकड्या हे भारतीय लष्करासाठी आव्हान बनले आहेत.