जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचातींमध्ये सुरु करण्यात येणार आहे.जळगाव तालुक्यातील असोदा येथील श्रीराम मंदिराजवळ सायंकाळी ४ वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडेल.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील , खासदार उन्मेष भैय्या पाटील ,आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जळगाव महापालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ मुकणे , असोदाचे सरपंच अनिता दिलीप कोळी ( पाटील ) ,उपसरपंच वर्षा गिरीश भोळे, ग्रामसेवक देवानंद सोनवणे यांच्यासह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहे. असे सामाजिक संस्था निमजाय फाऊंडेशनचे अध्यक्षा शीतल पाटील ( बाक्षे ) , सचिव भूषण पाटील ( बाक्षे ) आणि दीपक जावळे आणि पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्या दृष्टीने हा कौशल्य केंद्राची ही संकल्पना महत्वाची आहे. भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतेच मुंबई येथील बैठकीत सांगितले आहे.
हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह आपल्या महिला आणि बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजुबाजूच्या गावातील,खेड्यापाड्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटक यांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.
विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत असे निमजाय फाऊंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील ( बाक्षे ) यांनी दिली आहे. दरम्यान कवयित्री बहिणाबाईंच्या माहेर असलेल्या पावनभूमीत हे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ सुरू होत असल्याबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या दि.१९ रोजी सायंकाळी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास ग्रामस्थ ,विद्यार्थी आणि पुरुष-महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.