विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम
यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुक्यातील न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक १० जानेवारी रोजी ‘प्रोटेक्ट टुडे, सिक्युअर टुमारो’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व कायदेविषयक जनजागृती / प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार तसेच अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, यावल व प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर.एस.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात वृक्षतोड, कारखानदारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन, हरितगृह परिणाम, रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनरमधून निघणाऱ्या घातक वायूंमुळे निसर्गचक्रात होत असलेले बदल, जागतिक तापमानवाढ तसेच हवामानातील अस्थिरतेचे मानवी जीवनावर होणारे गंभीर परिणाम याबाबत सखोल प्रबोधन करण्यात आले.यामुळे मानवी तसेच वन्यजीवन मोठ्या संकटात सापडत असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या शिबिराचे प्रमुख वक्ते श्री.शशिकांत वारूळकर होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.बी.वारके होते. प्रास्ताविक श्री.के.आर.वाघुळदे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री.एल.आर.सुपे यांनी केले. उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता फिरके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

