पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पुण्यातील गाजलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांचा डाव अखेर फसला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. खेवलकर यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत न्यायालयाने पोलिसांची अधिक कोठडीची मागणी फेटाळून लावली.
प्रकरणात प्रांजल खेवलकर व इतर सहा आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. दोन वेळा पोलीस कोठडी संपल्यानंतर आज आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी खेवलकर यांच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह चॅट्स व व्हिडीओंचा दाखला देत अजून तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
सरकारी वकिलांनी न्यायालयात दावा केला की, खेवलकर यांनी एका महिलेचा नाचतानाचा व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवला होता, ज्यात ‘असा माल पाहिजे’ असे मजकूर होता. तसेच हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांशी संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांनी पुढे सांगितले की, या पार्टीसाठी अमली पदार्थ कुठून आणण्यात आले, याची माहिती आरोपी देत नाहीयेत. अद्याप एक आरोपी राहुल फरार असून, त्याबाबतही तपास आवश्यक असल्याचे पोलीस म्हणाले.
मात्र, न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य न धरता, सर्व पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, ज्यांच्या ताब्यात ड्रग्ज सापडले होते त्या महिलांना मागील सुनावणीमध्येच न्यायालयीन कोठडीतून जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.
तसेच, पोलिसांनी सातवा आरोपी राहुल फरार असल्याचे कोर्टात सातत्याने सांगितले असले तरी, गेल्या सात दिवसांमध्ये त्याच्याबाबत कोणतीही ठोस माहिती सादर केलेली नाही. परिणामी, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, खेवलकर यांना आता जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.