नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील पेठ भागातील रहिवासी विकास शालिक नाथ यांनी अध्यात्मिक भावनेने प्रेरित होऊन राजस्थान राज्यातील सुप्रसिद्ध काटू श्याम बाबा यांच्या दर्शनासाठी सायकलने बाराशे किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी नशिराबाद येथून सायकल प्रवासास प्रारंभ केला.
हा प्रवास केवळ शारीरिक क्षमतेचा नव्हे, तर श्रद्धा, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा उत्तम नमुना असल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ते काटू श्याम बाबा यांच्या दर्शनासाठी दुसऱ्यांदा सायकलने प्रवास करीत असून, हा त्यांचा धार्मिक आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणून नशिराबाद परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.प्रवासास रवाना होताना माजी सरपंच पंकज महाजन, उमेश महाजन, विनोद धर्माधिकारी, केवल नाथ, नामदेव महाजन, सुनील महाजन, बापू माळी, भैया बहारे, निलेश नाथ आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विकास नाथ यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या धार्मिक सायकल यात्रेचे स्वागत करत त्यांच्या निर्धाराचे आणि श्रद्धेचे कौतुक केले. विकास नाथ यांनी प्रवास सुखरूप पूर्ण करून नशिराबादचे नाव उज्ज्वल करावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.