ताईत, धागे, नारळ फोडणे, ज्योतिषांचे सल्ले… निवडणुकीच्या रणधुमाळीत अंधश्रद्धेचा ट्रेंड
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीचा जल्लोष रंगात आला आहे. गल्लीबोळात प्रचाराचे डोल, ढोल आणि गारुड सुरू झाले आहे. पण या सगळ्या राजकीय गडबडीत काही उमेदवारांनी वेगळाच मार्ग धरला आहे. तो विकासाचा नव्हे, तर अंधश्रद्धेचा! याचे उदाहरण बघायचे झाल्यास या अंधश्रद्धेमुळे कोणी उमेदवार सकाळी सूर्योदयाच्या वेळीच घराबाहेर पडतो आहे, तर कोणी खास जप करून मगच प्रचारात उतरतो आहे. काहींनी तर हातात लाल-पिवळे धागे बांधले आहेत, कुणी गळ्यात ताईत घातलेत, तर कुणी मतदारसंघाच्या चारही दिशांना नारळ फोडून ‘शुभ’ सुरुवात केली आहे. काही उमेदवार तर ज्योतिषांकडून “विजयाचा मुहूर्त” शोधण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान, या अंधश्रद्धाळू राजकीय कसरतींकडे मतदार मात्र हसत आहेत. बाजारात, चहाच्या टपऱ्यांवर आणि वाडी-गावात चर्चा सुरू आहे. “धागे-दोरे बांधून काय फायदा? लोकांना काम दाखवा, विकास दाखवा, हाच खरा शुभमुहूर्त आहे!”
या विषयी मतदारांशी संवाद साधला असता स्थानिक युवक म्हणतात, “रस्ते गचाळ, पाणी अनियमित, आणि दिवे बंद — या सगळ्या समस्या सोडवण्याचा मुहूर्त अजून आला नाही का?” तर काही ज्येष्ठ नागरिकांचं मत, “पूर्वीचे लोक काम करून आशीर्वाद मिळवायचे, आजचे उमेदवार तारखा आणि ताईत शोधतात.” मतदारांच्या या प्रतिक्रियांमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे आताची जनता अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकणारी नाही. जनता खुप हुशार आहे त्यांना आता फक्त विकास हवा आहे, स्वच्छता हवी आहे, रस्ते-पाणी आणि शिक्षण हवं आहे. ज्याने हे दिलं, तोच खरा भाग्यवान उमेदवार ठरणार.
निवडणुकीचं मैदान गरम झालं असलं तरी मतदारांनी आता आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. “काम करा, जनतेचं मन जिंका… बाकी ताईत, मुहूर्त आणि धागे-दोरे निवडणुकीनंतर काढून टाका!”

