Friday, March 20, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजभूषण’ पुरस्कार प्रा. डॉ.डी.एम.ललवाणी यांना जाहीर

राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजभूषण’ पुरस्कार प्रा. डॉ.डी.एम.ललवाणी यांना जाहीर

पंढरपूरच्या पावन नगरीत होणार सन्मान ; सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील श्रीमती पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, प्रख्यात समाजसेवक, गोसेवक व जैन समाजातील सक्रिय कार्यकर्ते प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय मानाचा ‘महाराष्ट्र समाजभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.प्रा. ललवाणी यांनी अनेक वर्षांपासून समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत समाजाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळे, सामाजिक एकजूट वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच विविध जनजागृती मोहिमांद्वारे त्यांनी समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य केले आहे.

निवृत्तीनंतर त्यांनी धरतीमाता व गोमाता सेवेवर विशेष भर देत निसर्गसंवर्धन, जीवदया आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व निःस्वार्थ सेवेमुळेच त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचे विशेष आकर्षण म्हणजे हा सन्मान पंढरपूर येथील विठुरायाच्या पवित्र नगरीत प्रदान करण्यात येणार आहे. आध्यात्मिक वातावरणात होणारा हा गौरव सोहळा प्रा. ललवाणी यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. यापूर्वीही विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, मित्रपरिवार, नातेवाईक, समाजबांधव तसेच विविध संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील तरुणांनीही समाजसेवेत पुढे यावे, अशी भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या