Tuesday, April 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही राज्यात इंधन व एलपीजी पुरवठा सुरळीत

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही राज्यात इंधन व एलपीजी पुरवठा सुरळीत

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मध्यपूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीवर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला असला, तरी महाराष्ट्रात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘पीआयबी’च्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी तसेच कृषी संचालक सुनिल बोरकर उपस्थित होते.

राज्यात सध्या २४ तेल डेपोमार्फत सुमारे ८,१०० पेट्रोल पंपांना सेवा पुरवली जात असून दररोज सुमारे १८,५०० किलोलीटर पेट्रोल आणि ४०,००० किलोलीटर डिझेलचे वितरण करण्यात येत आहे. १ ते ४ एप्रिलदरम्यानची विक्रीही मागील महिन्यांच्या सरासरीशी सुसंगत असल्याने इंधनटंचाईची कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नाही, असे डिग्गीकर यांनी स्पष्ट केले.राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून मागील महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘डीम्ड परमिशन’ देण्याच्या निर्णयामुळे नेटवर्क विस्ताराला गती मिळणार असून ज्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन पोहोचू शकत नाही, तेथे एलपीजीचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.

दरम्यान, राज्यातील २३ बॉटलिंग प्लांट्समार्फत सुमारे २,२०० वितरक आणि ३.५ कोटी ग्राहकांना सेवा पुरवली जात आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज सरासरी ५.८२ लाख रिफिल वितरित केले जात आहेत. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी डीएसी (Delivery Authentication Code) सक्तीचा करण्यात आल्याची माहिती शिधा नियंत्रक चंद्रकांत डांगे यांनी दिली.एलपीजी पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण भासल्यास नागरिकांसाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या