नागपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी व निकालाबाबत महत्त्वाचा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्पष्ट आदेश दिला आहे की, २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन्ही टप्प्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतरच २१ डिसेंबर रोजी एकत्रित मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करावेत.राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र न्यायालयीन वाद उद्भवल्यानंतर हा कार्यक्रम बदलण्याची गरज निर्माण झाली. २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी असलेली निवडणूक कायदेशीर गुंतागुंतीमुळे २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या सर्व निवडणुकींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच आयोजित केली जाईल, असे जाहीर केले होते.
याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले की, दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी सुरू करता येणार नाही. त्यामुळे आज झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवार, ३ डिसेंबर रोजी होणार नसून, २० डिसेंबरला होणारे मतदानही पूर्ण झाल्यानंतरच सर्व मतमोजणी एकत्रितपणे होणार आहे.न्यायालयाने एक्झिट पोलसंबंधीही महत्त्वाची सूचना दिली असून दोन्ही टप्प्यातील मतदान झाल्यानंतरच एक्झिट पोल प्रसिद्ध करता येतील, अशी मुभा देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसार नवी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आज आणि २० डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल फक्त २१ डिसेंबर रोजीच जाहीर केले जातील.या आदेशामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्सुकतेसोबतच तणावाचे वातावरण तयार झाले असून, ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्याबाबत २१ डिसेंबरपर्यंत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

