पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पुण्यातील खराडी परिसरात नुकत्याच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या सुनावणी दरम्यान खेवलकर यांनी न्यायालयात मोठा दावा करत सांगितले की, “पोलिसांनी रक्त चाचणीचा रिपोर्ट जर बदलला नाही, तर माझ्या शरीरात कोणत्याही अमली पदार्थाचे अंश आढळणार नाहीत.”
रक्त तपासणीतून निष्पाप सिद्ध होण्याचा दावा
प्रांजल खेवलकर यांचे वकील यांनी न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की, “खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही. जर रक्त चाचणी अहवालामध्ये फेरफार झाला नसेल, तर त्यातून हे स्पष्ट होईल.” त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, अशी मागणी त्यांनी केली.
सरकार पक्षाचा युक्तिवाद
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, “त्या फ्लॅटमधील पार्टीत कोकेन व गांजा आढळून आला आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले, कोणाकडून आणि कशासाठी वापरले गेले याचा तपास आवश्यक आहे.” त्यामुळे पुढील चौकशीसाठी प्रांजल खेवलकर यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
“माझ्याविरोधात ट्रॅप रचला”
खेवलकर यांच्यावर यापूर्वीही तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, “हे संपूर्ण प्रकरण राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. खेवलकर यांचे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आहे.” तसेच, “पोलिसांनी ट्रॅप लावून हे प्रकरण उभं केलं असून माझ्यावर पुर्वीपासूनच पाळत ठेवली जात होती,” असं म्हणत खेवलकर यांनी आपली बाजू मांडली.
पुढे काय?
या प्रकरणात पोलिसांचा तपास आणि रक्त तपासणीचा अहवाल काय सांगतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.