जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- रामानंद नगर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्वरित तपास करून आरोपीस अटक करत चोरीची दुचाकी जप्त केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याबाबतची हकीकत अशी की, खंडेराव नगर येथे राहणारे ज्ञानेश्वर उखा भोई यांनी आपली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-19-AS-5224) घरासमोर उभी केली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलीस हवालदार सुशील चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमीन शाह जहूर शाह (रा. न्यू दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडको) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यास दि. २५/०१/२०२६ रोजी अटक करून ३ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली.सखोल तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यात चोरी केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (MH-19-AS-5224) काढून दिली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.
सदर कारवाईत रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी व चालक पोना/संदीप बी. हाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सुशील चौधरी करीत आहेत.

