जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह:- रामानंद नगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन आज दिमाखात पार पडले. उद्घाटनाचे औपचारिक आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती लाभली.
रामानंद नगरमधील पोलीस ठाण्यासाठी आवश्यक जागा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने निश्चित करण्यात आली होती आणि त्याला अधिकृतपणे मंजूर देण्यात आली. या नवीन पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) कडून मंजूर करण्यात आला. हि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी इमारत असून या नवीन इमारतीमध्ये आधुनिक कार्यालयीन व्यवस्था, तांत्रिक साधने, आणि नागरिक व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या नवीन पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे रामानंद नगर परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाऊ शकते. यामुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.