टाटा मॅजिक वाहनातून २ लाखांचा मुद्देमाल जप्त.
रावेर/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- अभोडा ते मोरव्हाल रस्त्यावर बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी नेत असलेले तीन गोवंश प्राणी रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक बैल आणि दोन गोऱ्हे निर्दयीपणे बांधून टाटा मॅजिक वाहनातून वाहून नेले जात होते.
रावेर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील आणि इस्माईल तडवी यांच्या पथकाने अभोडा-मोरव्हाल रस्त्यावर सापळा रचून ही वाहतूक थांबवली.एमएच १५ बीजे २९४२ क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंश निर्दयीपणे बांधून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. या प्राण्यांची वाहतूक कत्तलीसाठी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी वाहन, गोवंश आणि अन्य साहित्यासह एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रशीद नथ्थू तडवी (रा. मोरव्हाल) याच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे कौतुक केले असून, गुरांची तस्करी रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.