रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-रावेर पोलिस स्टेशनतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी मोहिमेत दोन सराईत दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.दि. २३ मार्च २०२६ रोजी रावेर पोलिस स्टेशन येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अब्दुल रफीक अब्दुल कादर (वय ५२, रा. नागझिरी वाडा, रावेर) हे लतिफ हॉल येथे नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी गेले असता, कार्यक्रमानंतर परत येऊन पाहिले असता त्यांची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (MH-19-DW-4895) ही मोटारसायकल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणात आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळत नसताना, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार रावेर शहरात कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी दरम्यान दोन संशयित इसम वाहनांसह आढळून आले. त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी लतिफ हॉल परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आमिर खान अजमल खान जुनेद (वय १९, रा. खर्णीपुरा, ता. यावल) व रोहित अशोक बिहाडे (वय १८, रा. सिद्धार्थ नगर, ता. यावल) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून अंदाजे १४ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न तसेच ५० हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स (विना नंबर प्लेट) अशा दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी ४ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अंतर्गत कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गांज्याचे सेवन करणाऱ्या ३ इसमांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. याशिवाय गावठी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या २ इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या २ इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नरवरे, पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनिल मोरे, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

