रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सलग दुसऱ्या दिवशी रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोमांस विक्रीसाठी नेले जात असलेले वाहन अडवून मोठी कारवाई केली. या प्रकरणी वाहनासह दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.आज गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रसलपूर (ता. रावेर) येथून काही इसम गोमांस विक्रीसाठी कहाणपूर मार्गे जाणार आहेत. त्यानुसार दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी रावेर गुन्हे शोध पथकाने रावेर–बहाणपूर रस्त्यावरील हॉटेल क्रिशल परिसरात सापळा रचला. सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास संशयित छोटा हाती वाहन क्रमांक MH-04-EY-0343 घटनास्थळी येताच पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात गोवंश सदृश मांसाने भरलेली पोती आढळून आली.
या कारवाईत वाहन चालक शेख मुस्ताक शेख इसाक (रा. कुरेशी वाडा, रसलपूर) व त्याचा साथीदार मो. इलियास मो. याकूब (रा. बहाणपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघांविरोधात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पो. का. श्रीकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.आरोपींकडून अंदाजे २५० किलो वजनाचे गोवंश जातीचे मांस भरलेली ०५ पोती (किंमत अंदाजे ५०,००० रुपये) तसेच १,००,००० रुपये किमतीचे टाटा कंपनीचे पिवळ्या रंगाचे छोटा हाती वाहन असा एकूण १,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेऊन त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही धडक कारवाई पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पो.उपनि. तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.का. प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. योगेश महाजन करीत आहेत

