पुणे | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- खराडी येथील एका उच्चश्रू फ्लॅटवर पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या धाडीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती.या घटनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आज दिवसभर चालू आहे. या धाडीत कोकेन, गांजा, हुक्का, दारू यांसारख्या अमली पदार्थासह काही इतर साहित्य जप्त करण्यात आले होते., या प्रकरणात आज दुपारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना सात
दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सकाळी सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र तपास अधिकारी वेळेत पोहोचले नसल्यामुळे सुनावणीत विलंब झाला.न्यायाधीश चेंबरमध्ये निघून गेल्याने सुनावणी उशिरा सुरु करण्यात आली. तरीदेखील सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी मांडणी करत सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यांनी नमूद केलं की, या प्रकरणात आणखी तपास बाकी आहे. आरोपींच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी
यावर जोरदार युक्तीवाद करत संपूर्ण प्रकरण हे राजकीय हेतूने बनवण्यात आल्याचा दावा केला.त्यांनी पोलिसांवरच अमली पदार्थ ‘प्लांट’ केल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. मात्र न्यायालयाने सरकारी युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या अटकेनंतर प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या जावई असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. खडसे कुटुंबीयांवर राजकीय दबाव टाकण्यासाठीच ही कारवाई झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी तपास शास्त्रीय पद्धतीने चालवण्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान रेव्ह पार्टीची चर्चा चांगलीच रंगली आहे.