जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- एरंडोल रिंगणगाव येथील १४ वर्षीय मुलाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ३६ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
माहितीनुसार, तेजस गजानन महाजन (वय १४) हा १६ जून रोजी सकाळी ७.३० वाजता घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो परतला नाही. कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. याच दिवशी सायंकाळी गावाच्या बाहेर एका पडक्या शेतातील झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आंदोलन करत आरोपींचा तात्काळ शोध घेण्याची मागणी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि विशेष पथकांची स्थापना करण्यात आली.
स्थानीय गुन्हे शाखेने तपासाच्या दरम्यान घटनास्थळाजवळ वास्तव्यास असलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांकडे चौकशी केली. त्यातील दोन जण – हरदास वास्कले आणि सुरेश बारेला – हे अचानक गावातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि गुप्त माहितीच्या आधारावर हरदास वास्कले याला फैजपूरजवळ अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून सुरेश बारेला, रिचडीया कटोले आणि त्याने मिळून तेजसवर हल्ला केल्याचे तपासात उघड झाले. चाकूने गळ्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला व मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला होता.
दुसरा आरोपी सुरेश बारेला यालाही मध्यप्रदेशातील डोंगराळ भागातून अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी रिचडीया कटोले याचा शोध सुरू आहे. दोघांनाही एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.