१० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह पोलीस शिपायास ताब्यात घेतले.
नंदुरबार/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह पोलीस शिपायास १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने ताब्यात घेतले.
दत्त जयंतीनिमित्त सुरु झालेल्या यात्रोत्सवामुळे आणि घोड्यांच्या बाजार म्हणून प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा येथे दारु वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी तक्रारदार याने परवानगी मागितली. त्यासाठी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील (वय ४४) यांनी शनिवारी रोजी तक्रारदार यांच्याकडे २१ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
दरम्यान, लाचेच्या रकमेविषयी तडजोडी अंती १० हजार रुपयांची मागणी संदीप पाटील याने केली. शनिवार रोजी पोलीस शिपाई गणेश गावित चालक (वय ३८) याने पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास आणि पोलीस निरीक्षक पाटील यांना रंगे हात ताब्यात घेतले. सापळा अधिकारी म्हणून निरीक्षक परशुराम कांबळे यांनी काम पाहिले. पथकात हवालदार सचिन गोसावी आणि प्रफुल्ल माळी यांचा समावेश होता.