मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील आरोग्य सेवा सुलभ व पारदर्शक करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा, असेही ते म्हणाले.
विधानभवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निर्णय आणि निर्देश :-
• 398 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 2806 उपकेंद्रांचे आधुनिकीकरण
• ₹5983 कोटी निधीचा टप्प्याटप्प्याने वापर
• नवीन रूग्णवाहिकांसाठी करार प्रक्रीया सुरू
• औषधे व उपकरणे सुलभ पद्धतीने खरेदीचे आदेश
• AI तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर
• प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले योजना अंतर्गत रुग्णालयांचा डेटा ऑनलाईन
• आरोग्य संकेतस्थळ अद्ययावत करून योजना माहिती सहज उपलब्ध करणे
• आरोग्य सेवांच्या भरतीसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव
मुख्यमंत्री म्हणाले की, “आरोग्य सेवा ही जनतेसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. डिजिटल सेवा, अचूक माहिती आणि पायाभूत सुविधा यावर लक्ष केंद्रीत करून सेवा पोहोचवाव्यात.”
बैठकीत मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ. निपुण विनायक, सिडकोचे एमडी विजय सिंघल, PM-JAY चे CEO अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा आयुक्त महेश आव्हाड यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.