देवघरात लहानसे शिवलिंग ठेवण्याची सूचना; आठवड्यातून एकदा सैनिकांसाठी जल अर्पण करण्याचे आवाहन
जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले पाहण्याची सवय लावून घेणे हाच खरा दर्शनाचा अर्थ आहे. सर्वांमध्ये चांगले पाहण्याची सवय लावल्यास मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी आज येथे केले.शिवमहापुराण कथेचा आज दुसरा दिवस होता. ‘दर्शन’ याचा अर्थ फार मोठा असून परमेश्वराचे स्वरूप जनमानसात पहावे असेच यात अभिप्रेत आहे, असे त्यांनी महा शिवपुराण कथेत सांगितले.
येथील कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर असलेल्या श्री बडे जटाधारी महादेव मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात पंडित मिश्रा यांची कथा सुरू आहे.आज दुसऱ्या दिवशी साधारणतः साडेतीन लाख भाविक मंडळी उपस्थित होते.दुपारी २ ते ५ यावेळी कथा होत आहे. दुसऱ्या दिवशी भाविकांची संख्या वाढल्याचे दिसून आले.काहींना कथा नीट ऐकू येत नसल्यामुळे शेकडो भाविक मागच्या मागे पुन्हा घराकडे परतले. त्यांचा अपेक्षाभंग झाला,आणि नाराजीही व्यक्त केली.
कथाकार पंडित मिश्रा यांनी आज दुसऱ्या दिवशी दर्शन या शब्दाची व्याप्ती आणि व्याख्या याचे महत्त्व समजून सांगितले. आपण ज्यांना भेटतो, त्यांच्यात देव पाहण्याची सवय लावावी आणि इतरांचे वाईट पाहणे सोडून द्यावे. इतरांची प्रगती, वैभव मनुष्य पाहू शकत नाही, हाच सर्वात मोठा दुर्गुण त्याच्यात आहे. इतरांकडून आपण कोणतीही अपेक्षा ठेवू नये. शरीर शेवटपर्यंत चांगले ठेवावे हीच विनंती आणि प्रार्थना महादेवाला करावी असे सांगून पंडित मिश्रा मधुर वाणीतून म्हणाले,ज्यावेळी खूप दुःख होते आणि वाईट दिवस येतात अशावेळी माणूस खचून जातो. त्यावेळी सरळ महादेवाला शरण जावे आणि आपले दुःख त्याला सांगावे, असे पंडित मिश्रा म्हणाले.महादेवाला शरण गेल्यास आपले दुःख हलके होऊन नक्कीच योग्य मार्ग सापडतो. नक्षत्र, घड्याळ, कालचक्र आदी सर्व बाबी महादेवानेच बनवलेल्या आहेत.शिवमहापुराण कथा ऐकताना भूक,भोग आणि भोजन या गोष्टी संपुष्टात येतात. कथा ऐकून या तीन गोष्टींची आसक्ती कमी झाल्यास नक्कीच शिवप्राप्ती होते या शंका नाही.
चॅनल सुरू करण्याची घोषणा…
कथा ऐकताना बरेच जण आलेल्या अनुभवांविषयी पत्र पाठवतात. मात्र सर्वच पत्रे वाचणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकांना आलेले अनुभव व्यापक स्वरूपात कळावेत यासाठी विठ्ठल सेवा समितीतर्फे लवकरच एक स्वतंत्र चॅनल सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पंडित मिश्रा यांनी यावेळी केली.
सैनिकांसाठी जल अर्पण करण्याचे आवाहन….
दरम्यान, देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांसाठी प्रत्येकाने शिवलिंगावर आठवड्यातून किमान एक वेळ अर्पण करावे, असे आवाहन पंडित मिश्रा यांनी केले.आज दुसऱ्या दिवशीही वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. मालेगाव, नाशिक व धुळे तसेच राजस्थान आणि मध्यप्रदेश या भागातून अनेक महिला व पुरुष सराईत चोरटे यांची टोळी सक्रिय कार्यरत असल्याची माहिती असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.