जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील सुंदरमोती नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय मयुरी गौरव ठोसरने कौटुंबिक छळ, मानसिक त्रास आणि पैशांच्या मागण्या यामुळे कंटाळून आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहानंतर तिच्यावर सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला होता. असा आरोप तरुणीच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला असून, त्यातूनच ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मयुरीचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी आनंदात साजरा केला गेला, परंतु दुसऱ्या दिवशी, १० सप्टेंबर दुपारी, घरात कुणी नसताना तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला. ताबडतोब तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहेरचे नातेवाईक भावनिक आणि प्रचंड संतापित झाले असून त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर छळाचा आरोप करत त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. “न्याय मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मयुरीचे वडील भगवान बुडूकले आणि संपूर्ण कुटुंब ११ सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना तक्रार दिली असून आरोपींवर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकसाठी प्रयत्न सुरू आहेत. समाजात वाढत चाललेले कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रास यावर नियंत्रण आणण्यासाठीही सामाजिक संघटना आवाज उठवत आहेत.