शासकीय कामात अडथळा व अधिकाऱ्यांशी कथित दमदाटीचा आरोप!
सावदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सावदा पोलिस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून विधान परिषदेचे सदस्य आ. एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आ. खडसे सावदा पोलिस ठाण्यात आले होते. एका प्रकरणात गुन्हा नोंद न झाल्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. या वेळी पोलिस ठाण्यात वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे.तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित घटनेदरम्यान शासकीय कामकाजात व्यत्यय निर्माण झाला तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना अयोग्य भाषेचा वापर करून दमदाटी करण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणाबाबत आ. एकनाथ खडसे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

