नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील KST उर्दू माध्यमिक शाळेतील दहावी उत्तीर्ण सुमारे ८० विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) दिले जात नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे अकरावीतील प्रवेश धोक्यात आले होते.या प्रकरणाची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी शिक्षण विभागाच्या पथकासह घटनास्थळी धाड पाठवली. शाळेचा ताबा घेऊन विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट वितरित करण्यात आले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, मुख्याध्यापक शाळा कुलूपबंद करून पसार होण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिस संरक्षणात प्रशासनाने कुलूप तोडून शाळा उघडली आणि विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वाटप करण्यात आले.या प्रकारानंतर मुख्याध्यापक व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात “शासकीय कामात अडथळा” या कलमाअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा पुनरुच्चार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला.
“शिक्षणात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जाईल,” असे श्रीमती करनवाल यांनी स्पष्ट केले.