मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्य सरकारने शाळांच्या नावांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत नवे नियम लागू केले असून, अनधिकृत व दिशाभूल करणाऱ्या नावांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या नियमानुसार ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘युनिव्हर्सल’, ‘वर्ल्ड’ आणि ‘युरो’ यांसारखे शब्द संबंधित परवानगीशिवाय शाळांच्या नावात वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.तसेच, ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द केवळ ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांनाच वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘सैनिकी’ हा शब्द फक्त शासनमान्यताप्राप्त शाळांनाच वापरण्याची परवानगी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि शाळांच्या दर्जाबाबत पालकांची दिशाभूल होऊ नये, या उद्देशाने हे नियम लागू करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, संबंधित शाळांना नावात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.या निर्णयामुळे राज्यातील खासगी शाळांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, अनेक शाळांना आपली नावे बदलावी लागणार आहेत.

