जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- शनिपेठ पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावेळी चोरीस गेलेली बजाज पल्सर N160 ही दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांची बजाज पल्सर N160 ही दुचाकी चोरून नेली होती. यानंतर पोलीस नाईक श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका प्रदीप नन्नवरे यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला.
गुन्हे शोध पथकातील पोहेका शशिकांत पाटील, पो.अं. निलेश घुगे, रविंद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी व गणेश ढाकणे यांनी तपासाला गती दिली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी भुसावळ शहरातील पापानगर, ईराणी मोहल्ला येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर शनिपेठ तपास पथकाने भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रवी नेरकर, पो.अं. प्रशांत सोनार व सचिन चौधरी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. आरोपीकडून चोरीस गेलेली बजाज पल्सर N160 मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

