नेवासा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये तब्बल 2,474 बोगस कर्मचाऱ्यांचा घोटाळा उघडकीस आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बनावट मोबाईल ॲपद्वारे भक्तांची आर्थिक लूट झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
विधानसभेत आ. विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचना मांडत घोटाळ्याची माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी अहवालाचे तपशील जाहीर केले. या अहवालानुसार, प्रत्यक्षात नसलेले हजारो कर्मचारी दाखवून देवस्थानच्या निधीचा गैरवापर करण्यात आला.
महत्वाचे खुलासे:
देवस्थानमध्ये केवळ २५८ कर्मचाऱ्यांची गरज असतानाही २,४७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवण्यात आली.
अनेक बनावट बँक खात्यांवर पगाराचे पैसे वर्ग करण्यात आले.
रुग्णालयात दाखवलेले ३२७ कर्मचारी प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते, रुग्णही नव्हते.
तेल विक्री, देणगी, पार्किंग, गोशाळा, वृक्षारोपण विभागात फुगवलेली कर्मचारी संख्या.
बनावट मोबाईल ॲपद्वारे पूजेच्या नावाखाली पैसे गोळा केले जात होते.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, “धर्मादाय आयुक्तांपुढे अंतिम सुनावणी सुरू आहे. पण विधी आणि न्याय विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
फडणवीसांची टिप्पणी:
“शनीदेवाने गैरप्रकार करणाऱ्यांना आपला प्रताप दाखवला,” असा टोलाही त्यांनी लगावला.
अधिका तपास आणि कारवाई:
सायबर पोलिस विभागाकडून बनावट ॲप प्रकरणाची चौकशी.
विशेष तपास पथक बाहेरून नेमण्याचे आदेश.
शिर्डी, पंढरपूरप्रमाणे स्वतंत्र देवस्थान समिती स्थापनेची तयारी.
पार्श्वभूमी:
पूर्वी धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानुसार या देवस्थानाला क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र, पुन्हा चौकशी झाल्यावर घोटाळ्याचे विस्तृत स्वरूप उघड झाले.