जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात लोकशाहीचे शिल्पकार आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संतापजनक विटंबना झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.घटनेत काही समाजकंटकांनी बाबासाहेबांनी दिलेला “महामानवांनी एक व्हा” हा संदेश दाखवणाऱ्या पुतळ्याची विटंबना केली. हे कृत्य केवळ पुतळ्याचा अपमान नसून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावणारा आणि जातीय द्वेष पसरवण्याचा घृणास्पद प्रयत्न असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शेंदुर्णी येथे हजारो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जमले होते. परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. स्थानिक प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे संदिग्ध पोस्ट किंवा अफवा पसरवू नये, असा इशारा दिला आहे.

