जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, ज्येष्ठ शिक्षक आनंद पाटील, प्राजक्ता गोहिल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इयत्ता ९ वी (ब) च्या विद्यार्थिनींनी “असेच का आणि तसेच का” ही विज्ञानावरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.मानस कोष्टी व प्रज्वल साळुंखे यांनी डॉ. सी. व्ही. रमण तसेच ‘दैनंदिन जीवनातील विज्ञान’ या विषयांवर प्रभावी भाषणे केली. इयत्ता ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करून त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट केला. केतन कपाटे, समीर पिंजारी, सचिन पाटील आणि प्रसाद जैन यांनी “मूलद्रव्य एकमेकांशी कसा संवाद साधतात” या विषयावर छोटी नाटिका सादर करून रसायनशास्त्रातील संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. तसेच इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीतावर समूहनृत्य सादर केले.स्वाती एडके यांनी ‘रमण इफेक्ट’ या विषयावर तर प्राजक्ता गोहिल यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय तंत्रज्ञान)’ या विषयावर सोदाहरण मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून संशोधन वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुश्री मदाने यांनी केले. सूत्रसंचालन उज्वल साळुंखे व कृष्णा तांबट यांनी केले, तर आभार प्रदर्शन यामिनी चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विज्ञान शिक्षक ए. बी. पाटील, मिलिंद देशपांडे, पंकज खंडाळे, सुनीता रोटे, प्राजक्ता गोहिल, स्वाती एडके, जयश्री नेहेते, यामिनी चौधरी व मधुश्री मदाने यांनी सहकार्य केले.

