मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि त्याचा उपयोग त्यांच्या शेती उत्पादनात करता यावा, यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे – सन २०२५-२६’ ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स या देशांमध्ये शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जाणार आहेत. या दौऱ्यांच्या आयोजनासाठी पात्र प्रवासी कंपनीची निवड करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने कृषी आयुक्तालयामार्फत १४ जुलै २०२५ रोजी GeM (Government e-Marketplace) पोर्टलवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक प्रवासी कंपन्यांनी GeM पोर्टलवर जाऊन निविदेची सविस्तर माहिती प्राप्त करून अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
या अभ्यासदौऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि मार्केटिंग प्रणाली यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.