जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात झालेल्या भीषण अपघातात जळगाव (महाराष्ट्र) येथील सौ. लक्ष्मी विराणी यांचे दुर्दैवी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे डोंगरावरून प्रचंड दगड अचानक घसरून खासगी बसवर कोसळले. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सौ. लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे. तसेच १५ हून अधिक प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर पोलिस व स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून उद्या सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतर सौ. विराणी यांचा मृतदेह त्यांच्या कार्यस्थळी सहकारी श्री. तरुण रामचंदानी (वय २६) यांच्या ताब्यात देण्यात येईल व पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी संपर्क साधला. त्यांच्या तातडीच्या समन्वय व सहकार्याबद्दल जळगावकरांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. सौ. लक्ष्मी विराणी यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी धैर्य लाभो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केली जात आहे.