जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव पंचायत समितीच्या शिवतीर्थ परिसरात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून उभारलेली ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि प्रेरणादायी अभ्यासासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.
या उपक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या पुढाकारातून झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
अभ्यासिकेतील प्रमुख सुविधा:
वाचनासाठी मोकळा व सुसज्ज हॉल
पुरेशी व दर्जेदार प्रकाश व्यवस्था
शांत व शिस्तबद्ध वातावरण
सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेश
या उपक्रमामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत मोठी मदत होणार आहे. परीक्षांच्या तयारीसाठी योग्य जागा आणि सुविधा मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिक्षणासाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्यात झेडपी जळगावने उचललेले हे पाऊल आदर्शवत असून, भविष्यात अशा आणखी सुविधा इतर भागातही सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.