जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत राज्यभरातून एकूण ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन झाले आणि विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले. यंदा स्पर्धेत मुलींचा दबदबा राहिला, कारण तीनही गटात प्रथम क्रमांक मुलींनी प्राप्त केला.
पाचवी ते सातवीच्या गटात हर्षाली प्रविण पाटील (पळासखेडा), आठवी ते दहावी गटात चंचल वसंत गांगुर्डे (वाकोद) आणि अकरावी ते बारावी गटात मिताली संदीप काळे (जामनेरपुरा) यांनी सुवर्णपदक जिंकले. याप्रसंगी प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तीन हजार व दोन हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानपत्रे व स्मृती चिन्हे वितरित झाली.
पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सागरमल जैन उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पद्मश्री भवरलाल जैन यांची स्मृती उजळली आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास राखण्याचे सल्ले दिले. त्याचबरोबर जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे यांनी वक्तृत्व कौशल्य सुधारण्याच्या टिप्स दिल्या.
एकंदरीत ११ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यापैकी ८ पुरस्कार मुलींना मिळाले. यामुळे मुली केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे, तर सर्वच क्षेत्रात समोर आहेत, असे स्पष्ट झाले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर अमरावती येथून आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.