भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील साकेगाव शिवारात एका शेतातील विहिरीत अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दि. ४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.साकेगाव शिवारातील गट क्रमांक ३१८ ब मधील निलेश अनिल झोपे यांच्या नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील विहिरीत सदर मृतदेह आढळला. याबाबत निलेश झोपे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (ए.डी.) नोंद क्रमांक १०/२०२६ करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ वाल्मिक सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.मृत व्यक्तीचे डोके टक्कल पडलेले असून उजव्या हाताच्या मनगटावर कडे तसेच ‘ॐ’ चे गोंदण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधिताबाबत कोणास काही माहिती असल्यास भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

